स्वयंभू श्री देवी माऊली मंदिर

रेडीमधील माऊली देवीला कोकणातील ३६० गावांची राणी मानले जाते आणि ती स्थानिक लोकांमध्ये अत्यंत पूजनीय आहे.

स्वयंभू श्री माऊली माता ही पूर्वीच्या काळी महत्त्वाचे सागरी बंदर असलेल्या रेडीपट्टणम् म्हणजेच आजच्या रेडी या गावची ग्रामदेवता आहे. ही देवी अंबा या नावाने ओळखली जाते. तिला सत्याची देवता मानली जाते. असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या माऊली मातेचा कौल सर्व भाविक शिरोधार्ह मानतात. असे सांगितले जाते की तेराव्या वा चौदाव्या शतकात माऊली मातेचे मूळ मंदिर येथे बांधण्यात आले होते. यानंतर इ.स. १८२८ मध्ये ग्रामस्थांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्यानंतर २००० ते २००८ या कालावधीत प्राचीन मंदिराच्या मूळ गर्भगृहाच्या रचनेस धक्का न लावता या मंदिराचे नूतनीकरण व सुशोभीकरण करण्यात आले. या मंदिराची आख्यायिका अशी की जोधना (गोवा) येथून राम कामत आणि भातनागस हे दोघे रेडी परिसरातील या भागात शिकारीकरीता आले होते. त्या काळात हा भाग घनदाट जंगलाचा होता. ते शिकार करून थकले. रात्र झाली होती. त्यामुळे त्यांनी एका तलावाकाठी मुक्काम करण्याचे ठरवले. जवळच्याच झाडावर माची तयार करून ते तिथे झोपले. मध्यरात्री भातनागस याला दिव्य तेजाने झळाळणारी पालखी दिसली. त्याने राम कामत यालाही उठवून ती पालखी दाखवली. एवढ्या अपरात्री घनदाट जंगलात ती पालखी पाहून ते अचंबित झाले. नंतर त्यांना झोप लागली. झोपेत भातनागसला स्वप्न पडले. स्वप्नात देवीमाता सांगत होती की माझे स्थान येथील दुर्गाजवळ आहे. ती जागा स्वच्छ करून तिथे गाव वसवा. मी सर्वांचे कल्याण करीन. सकाळी उठल्यावर भातनागसने राम कामतला या स्वप्नाबद्दल सांगितले. जवळच्या गावातील लोकांना सांगून त्यांनी दुर्गाच्या परिसरात शोधकाम केल्यावर त्यांना येथे देवीची मूर्ती सापडली. याच ठिकाणी तिची स्थापना करण्यात आली. कालांतराने येथील भाग विकसित झाला.                   

सध्याच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या मंदिराच्या वास्तुरचनेत नागर आणि द्राविड अशा दोन्ही वास्तूशैलींचा सुंदर मिलाफ आढळतो. म्हापसा गावचे वास्तुरचनाकार श्री. सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली याचे काम करण्यात आले आहे. बांधकामासाठी उत्तर आणि दक्षिण भागातून कारागिर आणि शिल्पकारांना बोलावण्यात आले होते. हे मंदिर एका मोठ्या प्राकारात वसलेले आहे. एका भव्य गोपुरातून म्हणजेच मंदिराच्या प्राकाराच्या प्रवेश कमानीतून मंदिर परिसरात प्रवेश होतो. मुखमंडप, प्रशस्त खुला सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. मंदिरासमोर जांभ्या दगडात बांधलेला दीपस्तंभ आहे. तारकाकृती आकारामुळे तो उठून दिसतो. त्याच्या बाजूलाच एक ओट्यावर दगडी तुळशी वृंदावन आहे. 

मंदिराच्या सभामंडपास तीन दिशांना तीन प्रवेशद्वारे आहेत. दीपस्तंभासमोरील प्रवेशद्वार हे मुख्य आहे. दोन छोट्या पायऱ्या चढल्यावर मुखमंडपात प्रवेश होतो. बाजूला दोन चौकोनी दगडी खांब, त्यावर मोठी नक्षीदार कमान आणि त्यात प्रवेशद्वार असे त्याचे स्वरूप आहे. प्रवेशद्वाराच्या शाखांवर नक्षीकाम करण्यात आले आहे. त्याच्या तळाकडील बाजूस दोन प्रतिहारींची शिल्पे कोरलेली आहेत. चौकटीच्यावर द्वारशाखांच्या मधोमध ललाटबिंबावर गणेशाची प्रतिमा कोरण्यात आलेली आहे.शिल्प आणि बाजूला चवऱ्या ढाळणाऱ्या दोन गजांची शिल्पे आहेत. मंडारक म्हणजेच उंबरठ्यावरही कोरीव काम आहे. त्यास अर्धचंद्रशीला म्हणजे अर्धचंद्राकारातील पायरी आहे. मुखमंडपाचे छत गजपृष्ठाकार म्हणजे हत्तीच्या पाठीच्या आकाराचे आहे. येथील सभामंडप आयताकृती व खुल्या स्वरूपाचा आहे. बाजूस दगडी कक्षासने आहेत. आतील खांबांवर सुंदर नक्षीकाम केलेले आहे. आत सर्वत्र फरशा बसवलेल्या आहेत. खांबांच्या शीर्षस्थानी छतास लागून असलेल्या सोनेरी रंगाच्या आडव्या पट्ट्याही नक्षीकामाने सजवण्यात आल्या आहेत. छताकडील भागावर सिंह, तसेच देवतांची छोटी शिल्पे आहेत. सभामंडपातील यज्ञकुंडातील धूर थेट बाहेर पडण्यासाठी खास रचना करण्यात आलेली आहे. अत्यंत देखण्या अशा या मंदिराच्या सभामंडपावर पॅगोडाच्या आकाराचे छत आहे.

Scroll to Top